पुणे- पीएमपीच्या तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी स्थायी समितीच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत पीएमपीला तातडीनं 24 कोटींचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, हा प्रस्ताव स्थायी समितीचा होता. तसेच हा निधी कोणत्या अर्थशीर्षातून द्यायचा, याबाबत स्पष्टता नसल्याने महापालिका प्रशासनाने हा निधीच अद्याप पीएमपीला दिलेला नाही. त्यामुळे दिवाळी सुरू झाली तरी अद्याप या कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीत ना बोनस मिळाले आहे; ना वेतन त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
पीएमपीकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना बोनस तसेच सानुग्रह अनुदान दिले जाते. महापालिकेकडून पीएमपीला देय असलेल्या बस पास तसेच इतर अनुदानाच्या रकमेतून हा निधी दिवाळीत पालिकेकडून दिला जातो. त्यानंतर पीएमपीकडून तातडीनं हा निधी दिला जातो, दरवर्षी हा निधी देण्याची मागणी पीएमपी महापालिकेस करते. त्यानुसार, प्रशासन उचल देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवते. मात्र, या वर्षी प्रशासनाचा प्रस्ताव न आल्याने स्थायी समिती सदस्यांनीच हा बोनस देण्यासाठी पीएमपीला 24 कोटींची उचल देण्याचा प्रस्ताव दिला. स्थायी समितीनेही तो मान्य केला. त्या नंतर आता या प्रस्तावास मुख्यसभेची मान्यता आवश्यक आहे. तसेच हा निधी देण्यासाठी प्रशासनाकडे अंदाजपत्रकात अर्थशीर्षच नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हा 24 कोटींचा निधी पीएमपीला देण्यास असर्मथता दर्शविली आहे. परिणामी दिवाळी सुरू झाली तरी निधीच न आल्याने पीएमपी कर्मचाऱ्यांना अद्याप बोनसच दिलेला नाही.
अधिकारी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मिळाला पगार
पीएमपीकडून कर्मचाऱ्यांचे वेतन देताना तीन टप्प्यांत दिले जात असल्याने 1 तारखेला केवळ अधिकारी आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच वेतन झालेले असून उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन सात आणि 10 तारखेला होणार आहे. त्यामुळे दिवाळीत केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आहे. तर वेतनाची सर्वाधिक गरज असलेल्या वाहक आणि चालकांना 7 तारखेला वेतन मिळणार असून, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.