पुणे – शहरात पारंपरिक उत्साहात दत्तजयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. अभिषेक, महापूजा-आरती, दत्त याग, सत्यनारायण पूजेसह सायंकाळी मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा पार पडला.
घरोघरीही प्रथेप्रमाणे पूजा-अर्चा करण्यात आली. भजनी मंडळांच्या कार्यक्रमासह सायंकाळी मंदिरांमध्ये कीर्तन झाल्यानंतर दत्तजन्म सोहळा पार पडला. यानिमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्रीपर्यंत मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली.
मध्यवर्ती पेठांसह विविध भागातील मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये नेत्रदीपक आतषबाजी करून दत्तजन्म सोहळा झाला. दत्ताच्या विलाेभनीय मूर्तीसह मंदिराला फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत राेषणाई करण्यात आली होती. मंदिरामध्ये सकाळी दत्त महाराजांना चंदन अभिषेक व नूतन सुवर्णलिंपित आभूषणे तसेच वैजयंती मण्यांची माला परिधान करण्यात आली.
आमदार रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर, डॉ. पी. डी. पाटील, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ आणि राधिका गाडगीळ तसेच उद्योजक राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दत्तजन्म सोहळ्यानंतर सायंकाळी पालखी नगर प्रदक्षिणा व विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पालखी नगर प्रदक्षिणेची सुरुवात करण्यात आली.