सर्जेराव वाघमारे ः वीस ते पंचवीस लाख अनुयायी मानवंदनेसाठी येणार
शिक्रापूर – एक जानेवारी 2024 रोजी होणार्या 206व्या शौर्यदिनी कोरेगाव भीमा विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून तब्बल वीस ते पंचवीस लाख अनुयायी येण्याची शक्यता आहे. शौर्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाच्या नियोजनाने उत्तम पद्धतीने सुरु असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.
पेरणे येथील विजयस्तंभ येथे 1 जानेवारी 2024 रोजी 206वा शौर्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून एक महिन्यापूर्वीपासून उत्तम नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी 75 फुटी ऐतिहासिक विजय स्तंभाला फुलांची आकर्षक सजावट करुन त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान प्रतिमा देखील लावण्यात येणार आहे.
सध्या सुरु असलेल्या नियोजनाची पाहणी करत असताना कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे बोलत होते. यावेळी रिपब्लिकन कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज बनसोडे, रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, कमलेश चाबूकस्वार आदी उपस्थित होते.
येणार्या समाज बांधवांना प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा देखील देण्यात येणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झालेले असल्याचे देखील सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.