नागठाणे – काशीळ (गांधीनगर), ता. सातारा येथे दि २२ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घरांना टार्गेट करत घरफोड्या केल्या. त्यापैकी हणमंत मोरे (रा. गांधीनगर, काशीळ ) यांच्या घरातून सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार दि. २२ रोजी पाल ( ता. कराड) येथील खंडोबाची यात्रा होती. त्यामुळे काशीळ वरून सातारा व कराड बाजुने वाहतुकीची वर्दळ होती. गांधीनगर महामार्गा कडेलाच वसले आहे. मध्यरात्री अड़ीच वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील हणमंत मोरे यांच्या दुमजली पत्र्याच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरात प्रवेश केला व अंदाजे अठरा ते वीस तोळे सोने व जवळपास २ लाखांच्या रोख रकमेवर डल्ला मारल्याची चर्चा आहे. तसेच गांधीनगरमधील इतर चार बंद घरांचेही दरवाजे तोडल्याचे समोर आले. या बंद घरांमधील रहिवाशी मुंबईला वास्तव्यास असल्यामुळे नेमका किती ऐवज अथवा रक्कम गेल्याचे समजले नाही.
मोरे यांचे दुमजली घर आहे. घरातील लोकं खालचा दरवाजा बंद करून वरच्या मजल्यावर झोपले होते. दि. २४ रोजी घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने दागिने व रक्कम घरी आणल्याचे समजत आहे. घरफोड़ीवेळी अज्ञात चोरटयांनी तलवार, कोयता अशी शस्त्रेही सोबत आणल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. ही घटना कळल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि तेलतुंबडे स्टाफ सह, स्थागुशाचे पथक, श्वानपथक ,ठसेतज्ञ हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरा या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.