पुणे – सराईत वाहन चोरास खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी चार दुचाकी त्याने खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून, तर एक दुचाकी समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केली आहे. यापूर्वी खडक, विश्रामबाग, दत्तवाडी, कोथरूड, लष्कर आणि वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्यावर जबरी चोरी आणि वाहन चोरीचे मिळून तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.
अभिषेक ऊर्फ पप्पू शरद पवार (वय 33, रा. गुरूवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार समीर माळवदकर व फहिम सैय्यद यांना माहिती मिळाली की, पवार याने शुक्रवार पेठ येथून गाडी चोरी केली असून, तो घोरपडे पेठ येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करत पवार याला अटक केली. त्याच्याकडून स्वारगेट येथील कॅनॉल शेजारी ठेवलेल्या 1 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सह प्रभारी उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार फहिम सैय्यद, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, हिंम्मत होळकर, अजिज बेग, सागर केकाणे, अमेय रसाळ, अनिकेत बाबर यांनी ही कारवाई केली.