वाघोली – हवेली तालुक्यातील खामगाव टेक – हिंगणगाव मुळा मुठा – नदीवर वाहतूकीसाठी मोठा पुल तातडीने बांधण्याची मागणी हिंगणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव कोतवाल यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुळा मुठा नदीवर पूल झाल्यास जेजुरी ते रांजणगाव गणपती या मार्गावरील दोन तीर्थक्षेत्रे व सातारा रोड, सोलापूर रोड, नगर रोड असे तीन राज्य महामार्ग या पुलामुळे जोडले जाऊ शकतात. याशिवाय औद्योगिक वसाहत,शेतकरी, कामगार, कारखानदार, शालेय विद्यार्थी यांना हा पूल वरदान ठरणार असून मुळा मुठा नदीवर तातडीने पूल तयार करण्याची मागणी अंकुशराव कोतवाल यांनी पीएमआरडीए कडे केली आहे.
नदीवर पूल होण्यासाठी हिंगणगाव, शिंदेवाडी, मिरवडी, खामगाव टेक सांगवी सांडस, न्हावी सांडस या ग्रामपंचायतीने पूल होण्यासाठीची ठराव आपापल्या स्तरावर संमत केले आहेत असल्याचे कोतवाल यांनी सांगितले आहे.
हिंगणगाव, शिंदेवाडी, जगताप वाडी व इतर रस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचे विकास आराखड्यात समाविष्ट करावेत अशा मागणीचे प्रस्ताव व ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन सहसंचालक नगर रचना तथा महानगर नियोजनकार अभिजीत गिरकर यांची सरपंच अंकुश कोतवाल यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून पूर्व हवेलीच्या विकासाच्या दृष्टीने पुलाचे महत्व पटवून दिले . या कामी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अभिजीत गिरकर यांनी कोतवाल यांना दिले आहे.