हडपसर – (विवेकानंद काटमोरे ) कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात औषधोपचारासाठी आरोग्य विभाग धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, या सुविधा आम्ही प्रभागात कशा राबविल्या, या बॅनरबाजीत लोकप्रतिनिधी व इच्छुक गर्क आहेत. मात्र, बॅनरबाजीत गर्क असलेल्या या इच्छुक, पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनधींबद्दल अत्यंत संताप व्यक्त होत आहे. वेळ, काळ न पाहता काही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक हे सर्वजण राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही करतील, हेच यातून सिद्ध होत आहे.
शासनाने कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र, या लसीकरणासह तेथे सुविधा दिल्याचे श्रेय लाटण्याचा वाद सुरुवातीला काही नगरसेवकांत लागलेला होता. नंतर केंद्रांची संख्या वाढू लागली तसे सबंधित नगरसेवकांनी आपापल्या भागात लसीकरण केंद्र सुरू होताच त्याचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. पुढे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेल्या तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनीही महापौर व आरोग्य विभागाला पत्र देऊन लसीकरण केंद्र कुठे आणि कधी सुरू करण्यात यावे अशी मागणी सुरू केली. काही महिन्यांवर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने श्रेयवादाचे पेव फुटले आहे. त्यामुळे कोविड लसीकरणालाही काही नगरसेवक, इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी राजकीय आखाडा केला आहे. श्रेयवादाचा हा फंडा नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. बॅनरबाजीतून वाढलेली राजकीय तेढ अडचणीची ठरल्याने लसीकरण केंद्राबाहेर लागलेले लसीकरणाचे फ्लेक्स काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी काही लसीकरण केंद्रावरील फ्लेक्स गायब झाले आहेत,तर अजूनही काही फ्लेक्स अद्याप झळकताहेत. ते निघतीलही. मात्र, सोशल मीडियावर आज लसीकरण केंद्राच्या श्रेयवादाची नगरसेवकांसह ,इच्छुक समर्थकांत शाब्दिक जंग सुरू आहे. सोशल मीडियावर नगरसवेक, आघाड्यांच्या समर्थकांत श्रेयवादाचे जणू फुटलेले धुमारे राजकीय असल्याने प्रत्येक जण बाजू मांडताना दिसतो आहे. गुरुवारी (दि. ३) रोजी केशवनगर येथील ऑर्बिस स्कूल येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पदाधिकारी यांच्यात चांगलाच श्रेयवाद रंगला,तसाच प्रकार काळे- बोराटेनगर येथील मारुतराव काळे शाळेतील लसीकरण केंद्रावर भाजप आणि मनसेच्या कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यापूर्वी हडपसर मध्ये गाडीतळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पदाधिकारी यांच्यात तसेच शेवाळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात लसीकरण केंद्रावर असाच श्रेयवाद होवून राजकीय आखाडा भरला होता. त्यामुळे त्या सगळ्यात कोविडचे काम करणाऱ्यांना मारक ठरत आहेत. तरीही त्याचे राजकारण करणाऱ्याना त्याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. नागरिकांच्या भावना मात्र त्या विरोधात तीव्र आहेत. त्यामुळे लसीकरणाचे होणारे राजकारण थांबवण्याची गरज आहे.
हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 17 लसीकरण केंद्र आहेत. एक डॉक्टर,दोन नर्स आणि एक संगणक ऑपरेटर असे प्रत्येक लसीकरण केंद्रावर काम करत आहेत.महापालिकेतून लसीकरण केंद्र मंजूर होत असून लसीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा त्या ठिकाणी आहेत का एवढे पाहीले जाते. त्यानतंर तेथे लसीकरण केंद्र सुरू होते.त्यामुळे कोणत्याही लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप करू नये.किंवा कोणी तसा प्रयत्न केल्यास कर्मचारी वर्गाने त्याला बळी पडू नये. ही लसीकरण केंद्र सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी सुरू आहेत. स्लॉट बुकिंग आणि ऑफलाईन पद्धतीने नियमानुसार आलेल्या नागरिकांना उपलब्ध लस दिली जात आहे.आमच्याकडून कोणतेही राजकारण होत नाही किंवा त्याला आम्ही बळी पडत नाही. प्रसाद काटकर, साहाय्यक आयुक्त, हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय.