पुणे – वानवडी परिसरातील सय्यदनगरमध्ये लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेत एकाचा खून करण्यात आला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
यातील मयत हा तडीपार गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 10) रोजी सय्यदनगर परिसरात घडली आहे. आजीम शेख उर्फ अंत्या (35) असू खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजीम याला पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे. तरी देखील तो पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदनगरमध्ये आला होता. घरगुती कारणावरून आजीम आणि विरूध्द गटांमध्ये वाद भडकला. त्यामध्ये आजीमचा खून झाला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
इतर दोघांची बोटे छाटण्यात आली आहेत. ही घटना भर रस्त्यात घडल्याने मोठी खळबळ माजली होती. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.