पुणे – महापालिकेने सुरू केलेल्या बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यात आले.
याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या नातेवाईकांकडून तक्रारी येऊ लागल्यानंतर हा धक्कादायक उघडकीस आला. हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले आहेत.
शारदा अनिल अंबिलढगे (36 , रा.रहाटणी, थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (35 , रा. रहाटणीगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. अजयश्री मस्कर (रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर 2020 आणि फेब्रुवारी ते मे 2021 दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे महापालिकने सुरू केलेले करोना हॉस्पिटल डॉ. किरण भिसे यांना चालविण्यास दिले आहे. या ठिकाणी डॉ. मस्कर हे कोविड हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय काम पाहतात.
या हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी 334 रूग्णांवर एकाच वेळी उपचार दिले जाऊ शकतात. हे हॉस्पिटल फक्त कोविड रुग्णासाठी असल्यामुळे रुग्णांची परिस्थिती पाहून त्यांना उपचार दिले जातात. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर, नर्स, आया असे कामगार आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकांकडून मौल्यवान ऐवज, मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या. तसेच, काही मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील दागिने चोरी गेल्याचे सांगितले होते. त्यानुसार काही जणांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे अर्ज केले होते.