पुणे – ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यात ससून रुग्णालयातील शिपाई, जेल पोलीस आणि जेल मधील कॉन्सिलर यांचा समावेश आहे. महेंद्र यशवंत शेवते (वय-५७, रा. रक्षकनगर, खराडी), मोईस अहमद शेख (वय-३०, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) सुधाकर सखाराम इंगळे (वय४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ललित पाटील ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्याला पळून जाण्यास मदत केल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते, जेल पोलीस मोईस अहमद शेख आणि कॉन्सिलर सुधारकर इंगळे यांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक करण्यात आली.
दरम्यान महेंद्र शेवते आणि मोईस शेख यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना १ डिसेंबर २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सुधाकर इंगळे यांना मंगळवारी उशिरा अटक केल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.
दरम्यान, सरकारी वकील अॅड. निलीम इथापे-यादव यांनी न्यायालयात सांगितले की, महेंद्र शेवते हा ललित पाटीलसह भूषण पाटील, अभिषेख बलकवडे यांच्या संपर्कात होता. त्याने ललित पाटीलला पळून जाण्यास कशा प्रकारे मदत केली याचा तपास करायचा आहे. तसेच मोईस शेख हा येरवडा जेलचा कर्मचारी ससून मधील वार्ड क्रमांक १६ समोर गार्ड ड्युटीस होता.
२ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याने मोईस शेख याचा मोबाईल वापरून ऍड प्रज्ञा कांबळे आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी फोन वर बोलला आणि त्यानंतर पसार झाला. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत केल्या प्रकरणी दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपींच्या वतीने बाजू मांडताना ऍड. समीर घाटगे यांनी न्यायालयात सांगितले की, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने महेंद्र शेवते यांना सुट्टी होती. त्यामुळे शेवते ललित पाटीलला पळून जाण्यास कशी काय मदत करू शकतात असे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकुन दोन्ही आरोपीना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.