पुणे : मोक्का गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असणाऱ्या साथीदारांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा फोटो व येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेल्या केक तलवारीने कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दहा ते पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.
ओम बुरुड उर्फ सोनू, अनिकेत कातुर्डे उर्फ मन्या, अनिकेत धोत्रे, विशाल रत्नकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के (44) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम आरोपींचा साथीदार शुभम प्रदीप शिरकर हा कोयताच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त आहे .सोशल मीडियावर काही मुले सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून तलवारीने येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक कापत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता.
लाठया ,काठ्या, दगड शस्त्रे, अग्निशस्त्र ,स्फोटके बाळगण्यास पोलिसांचा मनाई आदेश असताना, ओम बुरुड व इतर आरोपींनी सदर आदेशाचा भंग केला. सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डवरील व सध्या येरवडा कारागृहामध्ये असलेला आरोपी शुभम शिरकर याच्या वाढदिवसानिमित्त केकवर त्याचा फोटो लावला. तसेच येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक बनवून तो तलवारीने कापून वाढदिवस साजरा करून हातामध्ये तलवारी घेऊन दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पुढील तपास करत आहे.