Pune Crime| वाघोली येथील पोलिस चौकीसमोर तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटविले. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याच्या कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मंगळवारी (दि.13) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहिदास अशोक जाधव ( वय 33, वाघोली) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हे 90 टक्के भाजल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सद्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोसायटीतील,पार्कींग, पाणी व अन्य कारणावरून झालेल्या वादात विकासकाने व इतरांनी तरुणाला मारहाण व शिवीगाळ केली. याबात तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र तरुणाच्या तक्रारीची पोलिसांकडून योग्य दखल घेतली न गेल्याने तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे.
याबाबत बोलताना जाधव यांचे नातेवाईक दत्तात्रय ढवळे यांनी सांगितले, रोहिदास जाधव हे सरकारी दवाखान्याचे मागे डोमखेल रोडवरील सिद्धी पार्क सोसायटी मध्ये राहतात. इलेक्ट्रीशनचे कामावर त्यांच्या कुटूंबाचा उदर्निवाह चालतो जाधव यांनी बिल्डरच्या विरोधात 10 फेब्रुवारी रोजी पोलीसात तक्रार दिली होती. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचबरोबर सोसायटीतील फ्लॅट धारकांनी 22 जानेवारी रोजी इतर दोघे हे कागदपत्रावरून त्रास देत असल्याचा लेखी अर्ज दिला होता. बिल्डर व इतरांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच त्यांना अटक करावी अशी जाधव याची मागणी होती. यासाठी ते सोमवारी पोलीस ठाण्यात व वाघोली चौकीत गेले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा ते सकाळी 11 च्या सुमारास वाघोली पोलीस चौकीत आले होते.
यावेळी पोलीस चौकीत तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याने त्याने स्वतःला पेटवून घेतले. जाधव यांचे नातेवाईक, नागरिक आणि तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी जाधव यांना पाणी , कपडे टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत जाधव गंभीर भाजले होते. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांचे नातेवाईक संतप्त झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांना उपचारासाठी तत्काळ तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत रुग्णालयात वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली.
“जाधव यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात शिवीगाळ व मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. तर त्याने ज्यांच्या विरोधात तक्रार दिली त्यांनीही त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. दोघांचेही अदखल पात्र गुन्हे दाखल होते. मात्र मी ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांना अटक करावी अशी रोहितची मागणी होती. सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात सरसकट आरोपीला अटक करता येत नाही. मात्र त्यांनी ऐकून घेतले नाही व स्वतःला पेटवून घेतले.” – विश्वजित काईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणीकंद पोलिस ठाणे
इतर बातम्या –
Pune: मध्यरात्री पुणे रेल्वे-स्टेशन येथे एका डब्याला आग; जीवितहानी नाही
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक सेवा असणार बंद