Pune-Mumbai Expressway : जर तुम्ही पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
वाहनधारकांना पर्यायी मार्गाने करावा लागणार प्रवास
द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिटजवळून वळवून राष्ट्रीय महामार्ग जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता येथील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनधारकांचा प्रवास सुरू असतो. परंतु गेली काही दिवसांपासून या मार्गावर सातत्याने मेगा ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे प्रवाशांंना मनस्ताप सहन करावा लागत आहे.