वाघोली (प्रतिनिधी)- लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शिंदे परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणार्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. छापा टाकून सात ठिकाणी जमिनीच्या खाली असणार्या टाक्या उद्ध्वस्त करत सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांचे रसायन व दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तीन जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गोवर्धन सोलंकी (वय 44 वर्षे), अरुण रमेश कुवरीया, संजय जगन्नाथ कुवरीया ( तिघेही रा. वडगाव शिंदे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव शिंदे येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.
हातभट्टी वर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी 1 कोटी 5 लाख रुपये किमतीचे 2 लाख 10 हजार लीटर हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, एक लाख 80 हजार रुपये किमतीची 1500 लिटर हातभट्टी गावठी दारु, ते तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार रुपये किमतीचे साहित्य. असा सुमारे 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत