पुणे – शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या सर्व्हिस क्वॉटेरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कॅमेरा बाथरुम आणी बेडरुममध्ये लावण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत 31 वर्षीय महिला डॉक्टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वॉटेरमध्ये आणखी एका महिला डॉक्टरसह रहाते. ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. यावेळी तीने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईट लावली असता तीही सुरु झाली नाही.
यामुळे तीने इलेक्ट्रीशयनला पाचारण केले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोलले असता, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणी बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला.
यानंतर तीने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करता सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समजले तसेच रखवालदारानेही येथे दुसरे कोणी आले नसल्याचे सांगितले. पोलिस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.