पुणे : दुचाकीत पेट्रोल भरायला झालेला उशीर त्यातून कामगार सोबत झालेली बाचाबाची आणि त्यानंतर बांबूने पेट्रोल पंपाची तोडफोड करत मालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ४ तासात अटक केली. तर त्यांच्या एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय २४, जयसिंग जलसिंग जुनी (वय-१९, दोघेही रा. पाटील इस्टेट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ कचरू काळे (वय-२६) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या घटनेत पेट्रोल पंप मालक सचिन अनिल शहा हे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी महापालिके जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपवर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दुचाकीत पेट्रोल भरायला उशीर झाल्याने सुरजितसिंग जुनी आणि त्यांच्या साथीदारांची पेट्रोल पंपावरील कामगारांशी बाचाबाची झाली. यानंतर हे तिघे अर्ध्या तासांनी परत आले यावेळी त्यांनी सोबत बांबू आणले होते. यावेळी जुनी व त्याच्या सहकाऱ्यांनी बाबूंच्या सहाय्याने पेट्रोल पंपाची तोडफोड केली.
यावेळी पेट्रोल पंपाचे मालक सचिन अनिल शहा हे केबिन मध्ये बसले होते. सुरजितसिंग जुनी आणि त्याच्या साथीदारांनी सचिन शहा यांना बांबूने मारहाण केली. त्यात सचिन शहा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मनपा जवळील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची अफवा उडाल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती.
तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी आरोपीना पकडण्याच्या सूचना दिल्या होता. तांत्रिक अहवाल आणि दुचाकीच्या नंबर वरून आरोपींचा शोध घेत चार तासाचा आत आरोपीना पोलिसांनी अटक केली.
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार भिवरे, सय्यद, रुपेश वाघमारे, साठे, पवार, मेंगडे, वाघ, निकाळजे आदींच्या पथकाने केली.