पुणे – एकतर्फी प्रेमातून प्रेयसीचा चावा घेत तीच्यावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना येरवडा येथील सावळेनगर येथे घडली. याप्रकरणी निहाल विशाल भाट (रा.कंजारभाट वस्ती, येरवडा) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी 20 वर्षीय तरुणी आणि आरोपी निहाल हा एकाच परिसरात रहायला आहेत. एकतर्फी प्रेमातून तो फिर्यादीच्या घराबाहेर चाकू घेऊन आला. तु घराबाहेर ये, माझ्या सोबत चल असे म्हणत हातातील चाकू हवेत फिरवून तु जर बाहेर आली नाही तर मी घराचा दरवाजा तोडून आत घुसेल, मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादीला जबरदसतीने गाडीवर बसवले.
यानंतर तीला स्वत:च्या घरी नेत माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर असे म्हणाला. मात्र फिर्यादी तरुणीने त्यास नकार देताच, राग अनावर झाल्याने निहालने तीला मारहाण करत गालाचा दाताने चावा घेतला. यानंतर चाकूच्या उलट्या बाजूने तीच्या पायावर वार करुन जखमी केले. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गाताडे करत आहेत.