खडकवासला(प्रतिनिधी) : पाचशे रूपये सुट्टे दिले नाहीत म्हणून खानापूर ( ता. हवेली) येथे कोयते नाचवत दहशत माजवून किराणा मालाच्या व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न काल राञी घडला. चेतन संभाजी जावळकर आसे व्यावसायिकाचे नाव आहे. पोलीसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
किराणा मालाच्या दुकानावर व्यावसायिक चेतन काम करत असताना सात ते आठ दिवसांपुर्वी लाल्या सोणवणे (रा.खानापूर) हा दुकानात येऊन पाचशे रूपये सुट्टे दे अशी मागणी करत होता. पैसे सुट्टे नसल्याने व्यावसायिकाने नकार दिला म्हणून लाल्या सोनवणे याने तुझ्याकडे पाहुन घेतो असे म्हणत धमकी देऊन निघून गेला.
मंगळवारी (3 जानेवारी ) दुकान बंद केल्यावर राञी 10.30 वाजण्याच्या सुमारास दुकानाजवळ मोठमोठ्याने आवाज येत असल्याने व्यावसायिक चेतन जावळकर यांनी खिडकीतून पाहिले असता लाल्या सोनवणे, तन्मय धिवार, रितेश भोसले आणि इतर चौघेजण दुकानाच्याखाली होते. त्यांच्या हातात असलेल्या दगड, दारूच्या बाटल्या, कोयते होते. तर तन्मय धिवार व चिक्या रणधीर यांच्या हातात लोखंडी कोयते होते तर इतरांकडे दारूच्या बाटल्या व दगड होते. त्यांनी दुकानाच्या शटर व काचेवर मारून दुकानाचे नुकसान केल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निरंजन नणवरे यांना दिली.
हल्लेखोरांनी दुकानातील कामगार सुराराम चौधरी यास दुकानाच्या बाहेर ये तुझ्याकडे बघतोच असे म्हणून शिवीगाळ केली . या हल्ल्यात दुकानदारांचे साधारण दहा हजार रूपायाचे नुकसान झाल्याचे दुकानदाराने सांगितले. खानापूर गावात दहशत माजवित शिवीगाळ दमदाटी करत निघून जाणाऱ्या हल्लेखोरा विरूद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सह पोलीस निरिक्षक निरंजन नणवरे करीत आहेत .