माजी मंत्री अनिल परब यांना ईडीचा दणका; 10 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई

मुंबई – नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.
याबाबत ईडीने ट्विट करत माहिती दिली आहे. परंतु, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असल्यास मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी या कारवाईनंतर म्हटले आहे.
ईडीने आज मनी लॉंड्रिंग प्रकरणात माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली होती. शिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते.





