पुणे – मार्केट यार्ड येथून घेतलेला माल अलिबाग येथे कमी भाड्यामध्ये आणून देतो असे सांगून टेम्पो चालकाने व्यावसायिकाचा तब्बल साडे सात लाख रुपयांचा माल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश देवासी असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र जैन (वय 55, रा. अलिबाग, रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन हे किराणा मालाचे होलसेल व्यावसायिक आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड येथून माल घेऊन तो अलिबाग येथे विक्री करण्याचे काम ते करतात. टेम्पोचालक देवासी याने यापुर्वी दोन ते तीन वेळा फिर्यादीने पुण्यातुन खरेदी केलेला माल अलिबागमध्ये पोचविला होता. त्यामुळे फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला होता.
दरम्यान, फिर्यादीने गुरूवारी मार्केट यार्ड येथील एम.एम.नहार यांचे दुकान तसेच पिसोळी येथील शतायु इंडस्ट्रीमधून तेलाचे डबे खरेदी केले होते. हे तेलाचे डबे अलिबाग येथे न्यायचे होते. त्यासाठी फिर्यादीने देवासी याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने कमी भाड्यामध्ये माल अलिबागला पोहोच करण्याची खात्री दिली. त्यानुसार, त्याने दोन्ही ठिकाणांहून माल घेतला. त्यानंतर तो अलिबाग येथे पोचणे आवश्यक होते. मात्र देवासी हा फिर्यादीचा माल घेऊन तेथे गेला नाही.