Pune Crime | ब्लॅकने 25 हजार रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या दोन सख्ख्या भावांना बेड्या; बालेवाडी परिसरातील घटना

पुणे – कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी गरजेचे असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्‍शनची बेकायदा विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन इंजेक्‍शन व दुचाकी जप्त केली. हि कारवाई बालेवाडी परिसरात करण्यात आली.

प्रदीप देवदत्त लाटे (वय 25), संदीप देवदत्त लाटे (वय 23, दोघेही सध्या रा. मोझे महाविद्यालयाजवळ, बालेवाडी, मूळ रा. बेलुरा, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपींविरुद्ध औषध किंमत नियंत्रण आदेश, जीवनावश्‍यक वस्तु आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन पंचवीस हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची खबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने बालेवाडी परिसरात सापळा रचला. त्यानंतर बालेवाडी येथे दुचाकीवर थांबलेल्या प्रदीप लाटे या व्यक्तीकडे बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ संदीप लाटे हा देखील या घटनेत सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.