पुणे – धुम स्टाईल चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने जेरबंद केले. संबंधीत आरोपी दरवेळेस नव नवीन राज्यात जाऊन गुन्हे करत होते. एकदा गुन्हे केले की ते पुन्हा संबंधीत राज्यात फिरकत नसत. तीन महिण्यापुर्वीच ते पुण्यामध्ये गुन्हे करण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी हडपसर भागात दोन चेन स्नॅचिंग, तीन दुचाकी चोरी आणि एक दोन लाखाची रोकड असलेली बॅग पळवली होती. संजय रामब्रिज सहाणी ( 21, रा.उत्तरप्रदेश, सध्या होळकरवाडी, ता. हवेली) आणि दिपककुमार अभयसिंग (21,रा.बिहार, सध्या. होळकरवाडी ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हडपसर परिसरात मागील काही महिण्यांत चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टींग आणि दुचाकी चोरीचे गुन्हे अचानक वाढले होते. यातील बहुतांश गुन्हे उघडकीस न आल्याने गुन्हे शाखा युनिट पाच त्याचा समांतर तपास करत होते. दरम्यान गुन्हे शाखेला दोन व्यक्ती चोरीची पल्सर दुचाकी पुढील नंबर प्लेट काढून वापरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिशी खाक्या दाखवताच त्यांनी एक बॅग लिफ्टींग आणि तीन दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रात
आरोपी संजय आणि दिपककुमार दरवेळी नवनवीन राज्यात जाऊन चोरी करत होते. त्यांनी आधी उत्तरप्रदेशात चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टींग केली. त्यानंतर ते दिल्लीत गेले, तेथेही त्यांनी चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी आणि बॅग लिफ्टींगचे सत्र सुरु केले. मात्र एका गुन्हयात संजयला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या गुन्हयातून कारागृहातून सुटका झाल्यावर त्याने थेट पुणे शहर गाठले. येथे तो जानेवारी महिण्यात आला.
आधि मिळेल ते काम मग हात की सफाई *
आरोपी नवीन राज्यात गेल्यावर प्रथम मिळेल ते काम करुन पोट भरत असत. पुण्यातही संजय जानेवारी महिण्यात आल्यावर त्याने पेटींगची कामे सुरु केली. येथे रहात्या परिसराची रेकी केल्यावर त्याने साथीदार दिपककुमारला मार्च महिण्यात बोलावून घेतले. त्यांनी सर्व प्रथम पल्सर दुचाकी चोरली. यानंतर चेन स्नॅचिंगचा धडाका लावला. दरम्यान त्यांनी एकाची दोन लाख रोकड असलेली बॅगही चोरली. या बॅग चोरीच्या गुन्हयाचा छडाही हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखा लावत होती. दोघा आरोपींकडून एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
याप्रकरणाचा तपास उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, विनोद शिवले, चेतन चव्हाण यांच्या पथकाने केली.