पुणे – कार रस्त्याच्या कडेला लावून आराम करणाऱ्या नागरीकास पत्ता विचारण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी नागरीकाच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून नेली. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. याप्रकरणी चंद्रकांत तापकीर (वय 66, रा. कल्याणीनगर) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापकीर हे जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या कारमधून कल्याणीनगर येथे जात होते. मात्र त्यांना झोप येत असल्याने त्यांनी त्यांची कार रस्त्याच्याबाजुला लावून ते कारमध्ये झोपले. काही वेळाने दुचाकीवरुन दोघेजण तेथे आले. त्यांनी फिर्यादीस कवडेवाडी येथे कसे जायचे ? अशी विचारणा केली. फिर्यादी यांनी कारबाहेर येऊन त्यांना पत्ता सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून तेथून पळून गेले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज कांबळे करीत आहेत.