पुणे – प्रसिध्द नृत्यांगणेच्या घरी 13 लाखाची चोरी करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही नृत्यांगणा नृत्याच्या कार्यक्रमासाठी गुजरात येथे गेल्यानंतर चोरीची घटना घडली. चोरी करणारा नृत्यांगणेच्या परिचयाचा आहे. शुभम अशोक माने (23, रा. फ्लॅट नं. , सुंदरतिर्थ आपार्टमेंट, मांगडेवाडी कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिया हौसाराव कांबळे (30 , रा. महावीर विहार, मांगडेवाडी मुळ रा. परांडा, धाराशीव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या नृत्यांगणा असून त्यांचे वेगवेगळ्या राज्यात नृत्याचे कार्यक्रम होतात. त्यांना गुजरात येथील एका लग्नातील नृत्याची सुपारी मिळाली होती. त्यामुळे त्या 26 जून रोजी गुजरात येथील वडोदरा येथे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना घरातील कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले.
लॉकरची पहाणी केली असता सोन्याचे दागिने, साडेसात लाखांची रोकड असा तब्बल तेरा लाख दहा हजारांचा ऐवज चोरून चोरल्याचे उघड झाला. गुन्हा दाखल झाल्यावर राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांना मिळालेल्या खबरीनूसार आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 12 लाख 22 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
आरोपी शुभम माने एका आयुर्वेदीक औषधालयात सेल्समन आहे. त्याची सिया बरोबर ओळख होती. त्याला ती एकटीच रहात असल्याचे तसेच तीच्या घरात मोठा ऐवज असल्याचे माहित होते. ती दौऱ्यावर गेल्याचे लक्षात येताच त्याने चोरी केली. या पैशातून तो मौजमजा करणार होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सावंत, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे आणि अभिनय चौधरी यांनी केली.