शेवगाव – राज्य परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगारास नुकत्याच संपलेल्या जून महिन्यात दोन कोटी 95 लाख 48 हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून देखभाल दुरुस्ती खर्चामध्ये (मेंटेनन्स चार्जेस) बचत केल्याने आगारास तीन लाख सहा हजार रुपयांचा नफा मिळाला असून, जिल्ह्यात शेवगाव आगाराचा दुसरा क्रमांक आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेंद्र फंड यांनी दिली.
शेवगाव आगाराने जून 2023मध्ये 2 लाख 95 हजार 48 रुपये उत्पन्न आणले. 5 लाख 22 हजार किलोमीटर माध्यमातून प्रतिकिलो मीटर 56.60 उत्पन्न आले असून, भारमान 86.96 टक्के इतके झाले आहे. आगारातील सर्वांच्या बहुमोल योगदानाचे हे फलित असल्याची प्रतिक्रिया आगार व्यवस्थापक फंड यांनी व्यक्त केली.
दि.19 जून ते दि. 3 जुलै या कालावधीत आषाढी सोहळ्यादरम्यान शेवगाव आगाराने 56 एसटी बसेसच्या माध्यमातून शेवगाव ते पंढरपूर अशा 134 फेऱ्या मारल्या. हा 32 हजार 393 किलोमीटरचा प्रवास झाला. त्यातून शेवगाव आगाराला 17 लाख 66 हजार 925 रुपये उत्पन्न मिळाले. या काळात 7 हजार 719 अमृत 75 वर्षांवरील नागरिक, 2 हजार 363 महिला व एक हजार 9 ज्येष्ठ नागरिकांनी विविध सवलतींचा लाभ घेतला. आगाराच्या या कामगिरीचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.