पुणे – सुपर कारच्या धडकेत एका 8 वर्षांच्या भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निना नरेश राय (57 , रा. एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. कार चालकाविरोधात सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहने चालवण्यासह प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याचा दरम्यान हॉटेल गुडलक समोर असणाऱ्या कलाकार कट्टा समोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निना राय ह्या पॉवफॅक्ट अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. त्यांना त्यांच्या एका सदस्याने माहिती दिली की, निळ्या रंग्याच्या लॅम्बोर्गिनी सुपर कारने (एमएच 12 के 2424) हॉटेल गुडलक समोरील 8 वर्षांच्या श्वानाला जोरदार धडक देऊन त्याच्या अंगावरून गाडी घातली आहे.
त्यानूसार त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने श्वानाला जवळील खासगी रुग्णालयात दाखल नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन श्वान मृत असल्याचे सांगितले. यानंतर ते श्वानाला घेऊन बालगंधर्व चौकीत गेले. तेथे माहिती दिल्यावर नायडू रुग्णालय येथील विद्युत दाहिनीत श्वानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जगदीश तळोले करत आहेत.