पुणे – कॉपीराईटच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या दोन कंपन्यांविरुध्द येरवडा व चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कंपन्यांना चित्रपटांतील गाण्यांसाठी कॉपीराईट शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. मात्र कंपन्यांनी अधिकाराच्या बाहेर जात फसवणूक करत शुल्क आकारले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच कंपन्यांच्या विरुध्द फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भोसलेनगर येथील रहिवासी विक्रम सदानंद शेट्टी (47) यांनी येरवडा पोलिसांकडे दोन्ही कंपन्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान मंगळवारी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आसिफ शेख व नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रायव्ह फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमिटेड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
येरवडा पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी सांगितले, “शेट्टी यांनी नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी 26 ऑगस्ट रोजी येरवडा येथील एक सेव्हन स्टार हॉटेल बुक केले होते. मात्र यामध्ये वाजवण्यात आलेल्या हिंदी गाण्यांसाठी दोन्ही कॉपीराईट कंपन्यांची शुुल्क आकारले होते. कॉपीराईट कंपन्या लग्न समारंभ, सगाई समारंभ आणि इतर धार्मिक कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी वाजवण्यासाठी कॉपीराइट शुल्क आकारू शकत नाहीत. मात्र दोन्ही कंपन्यांनी अशा प्रसंगी शुल्क आकारले. मात्र दोन्ही कंपन्यांनी चार व्यक्तींकडून 92 हजार 200 रुपये आकारले.
या दोन्ही कंपन्यांविरोधात 1 ऑक्टोबर रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कंपन्यांची गाणी वाजवण्यापूर्वी परवाना न घेतल्याबद्दल कॉपीराइट कायद्याअंतर्गत विविध तरतुदींचा धाक दाखवत धमकी देत त्यांनी अनेक लग्नसमारंभ आणी साखरपुड्याच्या कार्यक्रमांच्या बदल्यात रक्कम उकळली आहे. ते अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जबरदस्तीने प्रवेश करु शकत नाहीत तसेच शुल्कही आकारु शकत नाहीत.
चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात फिर्यादी शुभम दुग्गड याने स्वत:च्या लग्नासाठी जे.डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये हॉल बुक केला होता. तेव्हा त्याला हॉटेल प्रशासनाने गाण्यांसाठी कॉपी राईट शुल्क न भरल्यास कंपनीचे प्रतिनिधीमध्येच येऊन कार्यक्रम थांबवून आम्हाला नोटीस देत असल्याचे सांगितले.त्याप्रमाणे त्याने नोव्हेक्स व पीपीएल कंपनीच्या प्रतिनिधींना 77 हजार 400 रुपये शुल्क भरले होते.
कॉपीराईट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बड्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हाताशी धरले होते. एखादा मोठा लग्नसमारंभ किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम असेत तर हे कर्मचारी कंपन्यांच्या प्रतिनिधींना टीप देत होते. त्या बदल्यात कर्मचाऱ्यांनी पेटीएमव्दारे 500 ते 1000 रुपये पाठवले जात होते. यानंतर प्रतिनिधी प्रत्यक्षात कार्यक्रमात दाखल होऊन व्यत्यय निर्माण करत होते. हॉटेल व्यवस्थापनाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असते. पुर्वी न्यू ईअर किंवा ख्रिसमस पार्टी संदर्भात गुन्हा दाखल असेल तर त्याचा हवाला देत ब्लॅकमेल केले जात असे.