पुणे – ट्रक चालकाने सहकारी चालकाचा डोक्यात टॉमी घालून खून केल्याचा प्रकार लोणीकंद येथे घडला आहे. हा मृतदेह ट्रकमध्ये सडलेल्या अवस्थेत पडला होता. बाजूने जाणाऱ्या एका ट्रकचालकास उग्रवास आल्याने त्याने गाडीवरील नंबरवर फोन करुन ट्रक मालकास माहिती दिली. यानंतर ट्रक मालकाने केबिनमध्ये डोकाऊन पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली.
शहजाद अब्दुलक्युम अहमद (26, रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शमशुल अलीअहमद खान (रा. उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी संजय कालीरामना (41, रा. वापी, गुजरात) यांनी तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी कालीरामना यांच्या ट्रकवर शहजाद आणि शमशुल हे दोन चालक आहेत. ते तेलंगणावरुन पुण्यात येत असताना त्यांच्या रस्ता चुकला होता. यामुळे त्यांच्यामध्ये 25 जानेवारीला लोणीकाळभोर परिसरात वाद झाला. यामध्ये शहजाद याने शमशुल याचा गळा दाबला. शमशुलने बचावासाठी गाडीला असलेली टॉमी शहजादच्या डोक्यात मारली.
शहजाद कोसळल्यावरीही त्याने दोन ते तीन वेळा वार केले आणि तो पळून गेला. दरम्यान, कालीरामना यांना दोन्ही चालकांचे फोन लागत नव्हते. त्यांना एका ट्रकचालकाने 26 जानेवारीला सायंकाळी फोन केल्यावर ते घटनास्थळी आले. त्यांना शहजाद मृतावस्थेत दिसल्यावर त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.