पुणे – महाराष्ट्रात नवीन करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणात करोना रुग्णवाढ होत आहे. अशातच आता पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आलीय. पुण्यात नवीन करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे.
गेल्या 24 तासात शहरात 2 हजार 547 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण 2 हजार 771 जणांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पुणे शहरात दिवसभरात एकूण 15 हजार 153 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 547 जणांचा अहवाल हा पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 लाख 61 हजार 659 एवढी झालीय. तर आज करोनामुक्त झालेल्या 2 हजार 771 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 23 हजार 541 एवढी झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज करोनामुळे 32 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 रुग्ण हे पुणे शहरातील असून 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत पुण्यात एकूण 5 हजार 243 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात 32 हजार 875 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 674 रुग्ण क्रिटिकल असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 58 हजार 947 एवढी आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण 9 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण 1.89 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.65 टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित 5 लाख 14 हजार 639 जणांपैकी 4 लाख 45 हजार 942 जणांनी करोनावर मात केली आहे.