मालेगाव : देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याने ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून प्रशासना बरोबर स्थानिक लोकप्रतिनीधींनी पुढील पंधरा दिवस परिश्रम घेवून कोरोनाचा पराभव करावा, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
ग्रामीण भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेवून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा सभा आज आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते.
‘घाबरु नका पण काळजी घ्या’ हे ब्रिदवाक्य घेवून जनजागृती करा आणि कामाला लागा, असे सांगतांना मंत्री भुसे म्हणाले, लोकप्रतिनीधींसह समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे लढा दिल्यास कोरोना संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. प्राथमिक पातळीवर उपचार घेतल्यास कोरोनाला तात्काळ अटकाव घालणे शक्य आहे. गृहविलगीकरणाच्या संकल्पनेवर अंकुश आणावा. गृहविलगीकरणातील रुग्णांनी स्वत:च्या कुटुंबियासह गावाची काळजी घेत संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी व आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून ग्रामपातळीवरील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनीधींनी सहयोग द्यावा. कोरोनाच्या संकटकाळातील प्रतिकुल परिस्थितीत ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकासह आरोग्य कर्मचारी हे दर दिवशी गावात उपस्थित राहीले पाहिजे. जे कर्मचारी या निर्देशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेतही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.
लवकरच 22 लाख लसीचा पुरवठा…
जिल्ह्यासह तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असून लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्नशिल असून लवकरच 22 लाख लसींचा पुरवठा होणार आहे. यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी नागरिकांनी देखील पुढाकार घेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले.
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी भायगाव येथे 120 तर निमगाव येथे 50 बेडची सुविधा
तालुक्यातील भायगाव येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 120 बेडचे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याबरोबरच निमगाव येथेही 50 बेडची अतिरीक्त सुविधा उपलब्ध असून सामान्य रुग्णालयात 100 बेडचे आरक्षण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी करण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.
ग्रामसमित्यांसह दक्षता समित्यांनी प्रभागनिहाय कोरोनाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे सांगतांना मंत्री भुसे म्हणाले, तालुक्यात आज 71 प्रतिबंधीत क्षेत्र असून आजच्या दिनांकास प्राथमिक आरोग्य केंद्र करंजगव्हान येथे 110, वडनेर येथे 85, रावळगांव येथे 144 तर सौंदाणे येथे 66 ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात आज रोजी 608 रुग्ण असून ही संख्या मर्यादीत ठेवून, हे रुग्ण लवकरात लवकर बरी होण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनीधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही मंत्री भुसे यांनी यावेळी केले.