पुणे – शहरातील करोनाच्या रुग्ण संख्येत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ दिसू लागल्याने करोनाच्या शासकीय आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या दोन हजारांनी वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
करोनाची दुसरी लाट शहरात जून महिन्यात ओसरली होती. त्यानंतर दि. 8 जून पासून शहरात टप्प्या टप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यातच शहरात बाधितांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे.
हा आकडा दैनंदिन स्वरूपात वाढत नसला तरी अचानक तो लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, रुग्णवाढ वेळीच रोखण्यासाठी महापलिकेकडून तातडीने उपाय योजना हाती घेण्यात आली आहे. रुग्ण वाढण्यास सुरूवात झाल्याने पालिकेने बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे.
त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढणार असल्याने आता दररोज साडेचार हजार शासकीय चाचण्या तसेच तीन ते चार हजार खासगी चाचण्या अशा दैनंदिन आठ ते नऊ हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्या करताना सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.