पुणे – विजयस्तंभस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार्या अनुयायांसाठी विविध सुविधा कोरेगाव भीमा येथे करण्यास सुरूवात झाली आहे. दोन हजार शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे, गेल्या वर्षी ही संख्या दीड हजार एवढी होती. तर हिरकणी कक्ष एक वरून तीनपेक्षा अधिक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
विविध विभागांना विभागून दिलेली कामे त्यांचे अधिकारी स्थळ पाहणी करून कामे निश्चित केली जात आहेत. स्वच्छता, पाणी, आरोग्य सुविधेमध्ये नागरिकांना कुठलही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासन काळजी घेत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये वाढ करून 130 एवढी करण्यात येणार आहे. हिरकणी कक्ष हा कार्यक्रमस्थळी असणारच आहे, त्याशिवाय वाहनतळावर देखील हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हिरकणी कक्षामध्ये महिलांना आवश्यक योग्य व्यवस्था करण्यात येणार असून यावर्षी सुरक्षिततेसाठी पोलिसाची देखील नियुक्ती हिरकणी कक्षाची ठिकाणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाकडून १९ ठिकाणी ओपीडी सुरू ठेवली जाणार आहे शिवाय मोबाईल क्लिनिकची संख्या ही १९ असणार आहे. त्याचबरोबर परिसरातील खासगी रुग्णालयातील शंभर खाटा आरक्षित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.