संगमनेर : संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे निरक्षक भगवान मथुरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “एक सायकल लेकीसाठी” या नाविन्यपूर्ण प्रकल्पात 25 गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर असणाऱ्या पोलिसांचे हे सामाजिक दातृत्व बघून मला आत्मिक समाधान मिळाल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले.
लायन्स क्लब संगमनेर सफायर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, हेल्पिंग हँड प्राणी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, लायन्स सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, हेल्पिंग हँड प्राणी मित्र संघटनेचे अध्यक्ष भूषण नरवडे, लायन्सचे माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सुनीता मालपाणी, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा, पोलीस अधिकारी, लायन्सचे पदाधिकारी, देणगीदार, सामाजिक कार्यकर्त आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस विभाग आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने असे उपक्रम व्हायला हवेत. पुढील वर्षी 100 सायकल वाटपाचे उद्धिष्ट ठेवावे. अशा उपक्रमांतून चांगला सामाजिक संदेश जनतेपर्यंत जातो. नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्यासहित उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना आपण फोनवर संपर्क करू शकता, असे ओला यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की, गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीत सामाजिक उपक्रमाविषयी चर्चा झाली. हेल्पिंग हँडचे भूषण नरवडे यांनी सायकल वाटप उपक्रमात आघाडी घेतली. लायन्सचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी क्लबच्या माध्यमातून १२ सायकल उपलब्ध केल्या. यात देणगीदारांबरोबरच कल्बनेही ५०% रक्कम उपलब्ध करून दिली.
गरजू मुलींचा शोध घेऊन आज प्रकल्प पार पडतोय याचा प्रचंड आनंद असल्याचे मथुरे म्हणाले. लायन्सचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी सामाजिक कार्यात क्लब अग्रेसर असून यापुढेही अशा प्रकल्पात आमचा समावेश असेल असे सांगितले. सायकल वाटपाचे देणगीदार यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या वतीने करण्यात आला.