पुणे – नाताळनिमित्त सलग सुट्टया आल्यामुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांनी शुक्रवारी (दि. 22) रात्रीपासूनच स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी स्थानकात गर्दी केली होती. या दोन्ही आगारांतून कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर यांसह अन्य ठिकाणी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे शनिवारी (दि. 23) बस स्थानकावर गर्दी वाढल्याचे दिसून आले.
शनिवार आणि रविवार सुट्टी त्यानंतर नाताळच्या सलग सुट्टयांमुळे गावाला किंवा पर्यटनाला जाण्यासाठी नागरिकांनी एसटी स्थानकावर गर्दी केल्याचे दिसून येते. पुणे विभागातून सर्व मार्गांवर जादा बस सोडूनही प्रवाशांची गर्दी कमी होत नव्हती. कोकण, मराठवाडा, विदर्भाकडे जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. स्वारगेट आगारात प्रवाशांची तिकिटासाठी लांबपर्यंत रांग लागली होती.
जादा एसटी बसचे नियोजन…
स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोन्ही आगारांतून दररोज ५० ते ६० जादा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक या सवलतीमुळे एसटी बस भरून जात आहे. त्यामुळे महामार्गांसह अन्य मार्गावर प्रवाशांना ताटकळत बसची वाट पाहावी लागली. सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, धाराशिव व कोकणातील सर्व भागात जाणार्या बस भरून जात आहे.
खासगी ट्रॅव्हल्सची दिवाळी
रेल्वे, एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने नागरिकांनी आपला मोर्चा खासगी ट्रॅव्हल्सकडे वळवला आहे. त्याचा फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ केल्याने आर्थिक फटका बसत आहे. पुण्यातून सर्व मार्गावर जाणार्या ट्रॅव्हल्सचे तिकीट दर दोनशे ते तीनशे रुपये जादा आकारण्यात येत आहे. तसेच कोकण, मराठवाड्यात जाणार्या प्रवाशांकडूनही जास्तीचे तिकीट दर घेत आहेत.
“तीन दिवस सुटी असल्यामुळे सकाळपासून प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरील आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या.” – भूषण सूर्यवंशी, आगारप्रमुख, स्वारगेट