पुणे -गर्दीच्या वेळेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सीएनजी भरायला जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. हा प्रकार रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने 10 डेपोंमध्ये आणि काही स्थानकांवर सीएनजी पंप उभरण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व डेपोंची पाहणी झाल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडला पंप सुरू करण्यासाठीचे पत्र देणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2100 बस आहेत. यात 200 डिझेल, 458 ई-बस आणि 1500 सीएनजी बसचा समावेश आहे. पीएमपीतर्फे दररोज सरासरी 1750 बसमार्फत सेवा दिली जाते. पीएमपीच्या सीएनजी बससाठी दररोज दुपारी आणि रात्री शिफ्ट संपल्यानंतर पीएमपी बसला सीएनजी भरने बंधनकारक केले आहे. पण, प्रेशर कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा पूर्ण क्षमतेने सीएनजी भरला जात नाही. त्यामुळे काही वेळा पीएमपीचे चालक प्रवाशांना मध्येच उतरवून सीएनजी भरण्यासाठी निघून जातात. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. तसेच सीएनजी गॅस वाया जातो. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पीएमपीच्या प्रत्येक डेपोवर सीएनजी पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमपीचे सध्या एकूण पाच सीएनजी डेपो सुरू आहेत. या प्रत्येक डेपोवर दोन डिस्पेनसर आहेत. आता आणखी 10 डेपोमध्ये सीएनजीचे प्रत्येकी एक सीएनजी पंप सुरू केला जाणार आहे. तसेच पाच ई-डेपोमध्ये देखील सीएनजी पंप सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सीएनजी भरायला जाण्याचे कारण सांगून बसमधून उतरवण्याचे प्रकार कमी होणार आहेत आणि गर्दिच्या वेळेस नागरिकांना वेळेवर बस मिळणार आहेत. पीएमपी प्रशासनाच्या या निरर्णयामुळे पुणेकरांचा प्रवास विना अडथळा होणार आहे. तसेच प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहचता येईल.
प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि सीएनजी बचत करण्यासाठी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी 10 डेपोमध्ये सीएनजीचा प्रत्येकी एक पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
– रमेश चव्हाण, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल