पुणे – शहारातील “हरित पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छावणी परिसराला स्वच्छतेचा मात्र विसर पडला आहे. परिसरातील अनेक भागांमध्ये कचरा साचत असून, बोर्ड प्रशासनामध्ये कचरा विल्हेवाट आणि प्रक्रिया याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
परिणामी, नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित साचलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त कपडे, ओला कचरा, कागद यासारखा कचरा आढळतो. प्रामुख्याने मोकळ्या जागा, चौकातील एखादा कोपरा, ओढा-नाल्यालगत तसेच कचराकुंडीच्या आसपास कचऱ्याचे मोठे ढीग आहेत. बोर्डाच्या यंत्रणेकडून कचरा उचलला जात नसल्याने हा कचरा साचून कुजत आहे. नुकत्याचा झालेल्या पावसामुळे हा कचरा कुजला असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. याबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. मात्र, या समस्येवर प्रभावी उपाययोजना केली जात नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस…
कॅन्टोन्मेंट भागातील कचऱ्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन कायद्यांतर्गत बोर्डाला वारंवार नोटीस दिली आहे. मंडळाने बोर्डाला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सातत्याने सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. आगामी काळात बोर्डासंदर्भात अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा मंडळातर्फे देण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाचा नुसताच ढोल
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला यंदा 17 वे स्थान मिळाले. गतवर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या बोर्डाच्या कामगिरीत काहीशी सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात वेगळी स्थिती दिसून येते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्वच्छता स्थिती
निर्माण होणारा कचरा : 50 मेट्रिक टन / प्रतिदिवस
प्रक्रिया होणारा कचरा : 47 मेट्रिक टन / प्रतिदिवस
कचरा वर्गीकरणाचे प्रमाण : 80 टक्के
कचरा वाहतूक वाहने : 10