पुणे – महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहे. तर, राज्य शासनाने 27 टक्के ओबीसी आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. परिणामी, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 46 जागांसाठी तयारी करणाऱ्या सर्वच पक्षांचे विद्यमान तसेच संभाव्य उमेदवारांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश या निवडणुकांपर्यंत कायम राहिल्यास या जागा खुल्या गटासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या इच्छुकांना तिकिटासाठी चांगलेच झगडावे लागणार आहे.
प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पुणे महापालिकेने सोमवारी निवडणूक आयोगास सादर केला आहे. तर, 2021 ची जणगनना न झाल्याने राज्यशासनाने संभाव्य लोकसंख्या वाढ गृहीत धरून निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच महापालिकांत लोकप्रतिनिधींची संख्या वाढविली आहे. त्यामुळे पुणे शहरात हा आकडा 164 वरून 173 होणार आहे. तर या निवडणुका तीन सदस्यांचा एक प्रभाग यानुसार होणार असल्याने 57 प्रभाग त्रिसदस्यीय, तर एक प्रभाग 2 सदस्यांचा होणार आहेत.
त्यानुसार महापालिकेने ही प्रभाग रचना केली आहे. ती लवकरच अंतिम होणार आहे. ही रचना तसेच एकूण नगरसेवकांच्या संख्येनुसार पुण्यात खुल्या गटासाठी 102, अनुसूचित जाती-23, अनुसूचित जमाती-2, तर ओबीसी आरक्षणासाठी 46 जागा आरक्षित होणे अपेक्षित होते. त्यात 23 जागा पुरुष- तर 23 जागा महिला उमेदवारांसाठी असणार होत्या. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशाने या जागा खुल्या गटासाठी राखीव झाल्यास ओबीसी आरक्षित जागांसाठी तयारी करणाऱ्या विद्यमान तसेच संभाव्य उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
जागा कोणती मिळणार?
ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेला न्यायालयीन वाद लक्षात घेऊन हे आरक्षण न टिकल्यास प्रत्येक सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये उमेदवारांना संधी देताना 27 टक्के जागा ओबीसी उमेदवारांना देण्याची तयारी दर्शविली होती. जवळपास सर्वच राजकीय पक्ष यासाठी तयारीत असले, तरी आरक्षणामुळे ठराविक प्रभागात या उमेदवारांना संधी मिळणार होती. मात्र, आता पक्ष संधी देईल त्या प्रभागात या उमेदवारांना लढावे लागणार आहे.
प्रभाग रचनेनुसार ठरणार उमेदवार
आगामी महापालिका निवडणुका आयोगाने वेळेवर घेतल्यास त्यात ओबीसी आरक्षण असणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना प्रभाग रचनेत ओबीसीचे सर्वाधिक मतदार असलेल्या भागात ओबीसी उमेदवारांना संधी दिली जाईल. त्यामुळे आता प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेच ओबीसी उमेदवारांना आपल्याला सोयीस्कर प्रभाग ठरवता येणार आहे.