पुणे – “भाजपच्या माजी खासदाराने केवळ स्टंटबाजी आणि चमकोगिरीसाठी पुणे शहरास वेठीस धरले आहे. एखाद्या राजकीय पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरानंतर पुणेकर भाजपला माफ करणार नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमय्यांच्या सत्कारावरून भाजपवर टीका केली आहे.
“प्रत्यक्षात सोमय्या हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून, त्यांना ऑनलाइन तसेच इतर माध्यमांतून तक्रार करता आली असती. मात्र, त्यांनी केवळ चमकोगिरी करण्यासाठी दोन्ही प्रकार घडवून आणले आहेत. या प्रकारांमुळे शहरात गोंधळाची शक्यता असल्याने पोलिसांकडून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवत आंदोलन करू नये, अशी विनंती केली होती. इतर सर्व पक्षांनी त्यास सहमती दर्शविली होती. मात्र, त्यानंतरही भाजपने ही स्टंटबाजी केली आहे. हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही,’ अशी टीका जगताप यांनी केली आहे.