पुणे, दि. 13 -पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यानंतर आता नगर रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी काही स्वयंसेवी संस्था आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांनी नगर रोड मार्गावर बीआरटी मार्गाविरोधात आंदोलन केले. अर्धवट बीआरटी मार्गामुळे वडगाव शेरी भागात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी बीआरटी बंदची मागणी केली.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या मागणीनंतर महापालिकेनेही पीएमपीएमएलला पत्र पाठवित बीआरटी बंद करण्याबाबत विचारणा केली. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी बीआरटी मार्ग बंद करण्यास नकार दिला. बीआरटी ही सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधेसाठी असल्याने ती बंद करू नये, अशी भूमिका घेतली.
पीएमपीच्या भूमिकेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषद घेत बीआरटी ही शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा महत्वाचा घटक असून, ती कोणत्याही स्थितीत बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर बीआरटी मार्गावर पडदा पडला असे वाटत असतानाच आता नगर रोड परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नगर रोडवर येरवडा ते वाघोलीपर्यंत बीआरटी मार्ग आहे. पण मेट्रोचे काम सुरू असल्याने येरवडा ते “आपले घर’पर्यंत मार्ग बंद आहे.
वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास अर्धवट बीआरटी बंद करा आणि खासगी वाहनांसाठी मार्ग खुला करा.
– आशिष माने, अध्यक्ष, वडगाव शेरी नागरिक मंच