पुणे- वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून या महागाईस केंद्राची चूकीची धोरणे जबाबदार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवार चौकात हनुमानाची आरती करत महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महागाईची देवी असा प्रतिकात्मक उल्लेख करत कमळाबाईची महाआरती करत केंद्राच्या धोरणांवर टीका करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, निलेश निकम, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख, महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, रुपाली ठोंबरे पाटील आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे. आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत. पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी, घरगुती गॅस, व्यावसायिक गॅस, खाद्यतेल अशा सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत असून केंद्राने तातडीने ही दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.