सातारा -पुढे पोलीस बंदोबस्त आहे. अंगावर एवढे सोने घालून फिरू नका. आमच्याकडे द्या. तुम्हाला आम्ही दागिने पुडीत बांधून देतो, असे म्हणून दोन भामट्यांनी कमल रामराव शिंदे (वय 76, रा. साई कॉलनी, शाहूनगर) यांना तब्बल एक लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी 5.45 च्या सुमारास अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला नलवडे कॉलनीत घडली.
याबाबत माहिती अशी, कमल शिंदे (वय 76) या काल सायंकाळी नलवडे कॉलनीतून जात असताना, दोन युवक तेथे आले. पुढे बिलबिलेसाहेबांचा बंदोबस्त लागला आहे. अंगावर एवढे सोने घालून फिरू नका, असे सांगून भामट्यांनी शिंदे यांच्या हातातील पाच तोळ्यांच्या चार बांगड्या काढून घेतल्या. त्या बांगड्या पुडीत ठेवून भामट्यांनी ती पुडी शिंदे यांच्या हातात दिली. त्यानंतर दोघांनी धूम ठोकली. काही अंतर पुढे गेल्यानंतर शिंदे यांनी पुडी उघडून पाहिली असता, बेंटेक्सच्या तीन बांगड्या दिसल्या. त्यांनी हा प्रकार घरातल्या लोकांना सांगितल्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.