पुणे – जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी रोग संसर्गामुळे मार्केट यार्डातील गुरांचा बाजार पुढील पंधरा दिवस बंद राहणार आहे. सरकारच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड आणि गुरे विभाग प्रमुख आशिष राऊत यांनी दिली.
मार्केट यार्डातील गुरांचा बाजार दर रविवारी भरतो. येथील बाजारात सर्वाधिक म्हशी विक्रीसाठी येत असतात. गुजरात भागातून म्हशी विक्रीसाठी येण्याचे प्रमाण मोठे आहे.
“करोनाच्या काळातही बराच काळ जनावरांचा बाजार बंद होता. त्यानंतर आता लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस बाजार बंद राहणार आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले जाईल.
-आशिष राऊत, विभागप्रमुख, गुरे विभाग
याबरोबर इंदापूर, बारामती, दौंड इतर भागातून बोकड तसेच बैल येथे विक्रीसाठी येतात. पण, प्रमाण कमी असते. साधारणपणे दर रविवारी 80 ते 100 जनावरे येथे विक्रीसाठी येत असतात. या बाजारातून वार्षिक अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळते.