हडपसर : खोतीदार शेतकऱ्यांना मज्जाव केल्याने भिक मागो आंदोलन करण्यात आले.
हडपसर – कै.अण्णासाहेब मगर उपबाजार समितीमध्ये खोतीदार शेतकऱ्यांना मज्जाव केल्याने खोतीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, संचालक मंडळाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी बाळासाहेब भिसे यांनी हडपसरमध्ये भिक मागो आंदोलन केले. निर्णयाचा फेरविचार करून खोतीदारांना परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा भिसे यांनी दिला आहे.
हडपसर भाजीपाला मार्केट येथील जागेची मर्यादा लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीने शेवाळवाडी येथे उपबाजार स्थलांतरित केला. तेरा वर्षांपूर्वी कै.अण्णासाहेब मगर उपबाजार नावाने सुरू झालेल्या या मार्केटमध्ये खोतीदार सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा माल बांधावर खरेदी करून या उपबाजारात विक्रीसाठी आणत आहेत. बाजार समितीच्या वतीने या खोतीदारांकडून सर्व प्रकारचा महसूल घेतला जात होता. प्रशासक असताना या उपबाजारात खोतीदार माल विकत होते.
परंतु, संचालक मंडळ नियुक्त झाल्यावर व्यापार करण्यास मज्जाव केला जात आहे. शेतकरीच माल विकणार हे कारण दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. शेतकऱ्यांसाठी उपबाजार आहे, खोतीदारांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगून नियमावली मांडत असताना इतके वर्षे खोतीदार व्यवसाय करत होते. त्यांच्याकडून महसूल गोळा केला तो नियमबाह्य होता का? असा सवाल बाळासाहेब भिसे यांनी उपस्थित केला आहे.