जामखेड – आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकावरील आर्थिक व मानसिक अन्यायाविरुद्ध तसेच संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज जामखेड तालुका परिचालक संघटनेच्या वतीने जामखेड पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शासन संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी राज्यातील सर्व संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात भरीस भर म्हणून कंपनीने अतिरिक्त टार्गेट दिले. परंतु, त्या टार्गेटच्या नावावर बोगस कामे वाढू शकतात. सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे कंपनीने टार्गेट पद्धत बंद करावी, संगणक परिचालकांवर अतिरिक्त कामांचा भार लादू नये, सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे, आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक 20 हजार रुपये वेतन देण्यात यावे, नियमबाह्य कामे लावताना त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा, कॉम्प्युटर ऑपरेटर यांना दिवाळीपूर्वी मागील दोन महिन्यांचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनस्थळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या व भावना जाणून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवणार असून त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात जामखेड तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष संदीप जायभाय, सचिव रविंद्र कोळपकर, उपाध्यक्ष नानासाहेब शेळके, प्रसाद नन्नवरे, विजु काळे, संदीप तुपेरे, बाळासाहेब गोपाळघरे, विजय लांडे, ज्ञानेश्वर सुतार, ऋषिकेश वराट, दीपक ढवळे, युवराज भोरे, प्रदिप गायकवाड, शशी कोळपकर, नाना सावंत, अमोल मगर, हनुमंत उदमले, ऋषिकेश उगले,व नीलम उगलेसह जामखेड तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.
आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा
आंदोलनाला प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नयुम सुभेदार यांनी भेट देऊन जाहिर पाठिंबा दिला. यावेळी शासन संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा प्रहार संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष सुभेदार यांनी दिला