पुणे | किरकोळ वादातून उपाहारगृहातील कामगाराला मारहाण करून गल्ल्यातील नऊ हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून नेण्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
प्रशांत लिंगप्पा तुंगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याबाबत उपाहारगृहचालकाच्या मालकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तुंगे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील रेड चिली रेस्टॉरंट आणि बारमध्ये दोन दिवसांपूर्वी सायंकाळी आले होते. तुंगे आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राने उपाहारगृहातील कामगार आणि व्यवस्थापकाबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. तुंगेने मद्यााच्या रिकामी बाटली फोडली. उपाहारगृहातील भागीदाराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुंगेने बाटली भागीदाराच्या डोक्यात मारली.
उपाहारगृहातील खिडकीची काच फोडली. उपाहारगृहातील गल्ल्यातील नऊ हजारांची रोकड आणि भागीदाराचा मोबाइल संच असा ऐवज लुटून तुंगे आणि त्याच्या बरोबर असलेला साथीदार पसार झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्ना वाघमारे तपास करत आहेत.