पुणे : खरेदीसाठी निघालेल्या महिलेकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वडगाव शेरीतील आनंद पार्क परिसरात ही घटना घडली.
राहुल राजेंद्र पवार (वय २०, रा. आव्हाळवाडी रस्ता, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि त्यांची सून मंगळवारी सायंकाळी खरेदीसाठी निघाल्या होत्या.
त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा पवार याने तक्रारदार महिलेकडील रोकड असलेली पिशवी हिसकावण्याच्या प्रयत्न केला. झटापटीत महिला खाली पडली. त्या वेळी तेथून जात असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. नागरिकांनी तत्परता दाखवत पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पवारला पकडले.
पवारला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने पादचारी महिलांकडील मोबाइल संच तसेच त्यांच्याकडील ऐवज हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.