पुणे – देशभर करोनाचा कहर सुरू असताना, दुसरीकडे राजकीय चिखलफेक वाढली आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना सोशल मीडियावर भिडत आहेत. मात्र, हे राजकारण दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जाताना दिसत आहे.
यामध्ये नेत्यांसह थोर व्यक्तींची बदनामीही केली जात आहे. अशा कारणांतून तब्बल 150 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.करोनामुळे देशात मृत्यू वाढत आहेत. यातच लसींचा साठा-पुरवठा, ऑक्सिजन कमतरता आदी प्रश्न पुढे येत आहेत. यावर विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषद, वृत्त वाहिन्यांवर वारेमाप चर्चा करत आहेत. त्यातून ते टीकेची झोड उठवत आहेत, तर या टीकांना सत्ताधारी नेतेही आक्रमकतेने उत्तर देत आहेत.
करोना काळातील चांगल्या कामांचे श्रेय व अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याची राजकीय स्पर्धा लागली आहे. अशावेळी राजकीय कार्यकर्तेही मागे कसे असतील? हे कार्यकर्तेही सोशल मीडियावर दोषारोप करण्यात अग्रेसर आहेत. हे करताना नेत्यांची छायाचित्रे क्रॉप करून वापरणे, एखाद्या चुटकुल्यातून बदनामी करणे किंवा एखादा व्हिडिओ एडिट करणे असे प्रकार केले जातात.
यात अनेकदा व्यक्तीच्या बदनामीचाच उद्देश असतो. मात्र, हा प्रकार अनेकदा खालच्या पातळीवर घसरला जातो. त्यामुळे राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी नेत्यांच्या बदनामीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत.
अशा प्रकरणांत एकट्या पुण्यात सायबर पोलिसांत 130, तर विमानतळ व हडपसर पोलिसांत 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पाच “एफआयआर’ आहेत. यातील दोन सायबर पोलीस, तर उर्वरित विमानतळ, हडपसर आणि विश्रामबाग पोलिसांत दाखल आहेत. तसेच दहा तक्रार आजही पोलिसांकडे आले आहेत.
शेजारच्या पिंपरी पोलीस आयुक्तालय हद्दीत सांगवी पोलिसांत 19 जणांविरुद्ध असाच गुन्हा दाखल आहे. हे सर्व गुन्हे राजकीय नेत्यांची बदनामी केल्याचे आहेत. ही बदनामी छायाचित्रे मॉर्फ करून तसेच बदनामीकारक संदेश फॉरवर्ड करून केली गेली आहे.
ऑक्सिजन-बेडची उपलब्धता, औषध तुटवडा, विस्कळीत व्यवस्थापन आदी करोनाशी संबंधित प्रश्नांवरून समाज माध्यमांत राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांची बदनामी केली जात आहे. तसे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस भादंवि कलमांसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आहेत.
– डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल