पाथर्डी – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे येथे दि. 21 जानेवारी रोजी पाथर्डी तालुक्यातून पदयात्रा घेऊन येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केली आहे. पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपासून त्यांच्या स्वागतासाठी भव्य नियोजन करण्यात आलेले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातून मुंबईपर्यंत पदयात्रा घेऊन उद्या निघतात. ही पदयात्रा गेवराई मार्गे पाथर्डी तालुक्यातून जाणार आहे, त्यासाठी मराठा समाजासह इतर ओबीसी समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. दि. 21 जानेवारी रोजी सकाळी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी या जिल्हा हद्दीत जरांगे पाटील यांची पदयात्रा प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत हजारो आरक्षण सैनिक असणार असल्याने त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील प्रवासात कुठल्याही प्रकारची अडचण, समस्या येऊ नये, यासाठी आज अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी त्यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलावली. त्यामध्ये पदयात्रेचे स्वागताचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली.
ढाकणे म्हणाले, जरांगे पाटलांची त्यागाची भावना लक्षात घेऊन एक व्यक्ती समाजासाठी सर्व त्याग करून समाजाच्या भल्यासाठी लढतोय ही गौरवास्पद बाब आहे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये मतमतांतरे असू शकतील, मात्र मला जरांगे पाटलांच्या लढवय्या भूमिकेचं कौतुक वाटते. मी आणि आमचे सर्व सहकारी त्यांचे पाथर्डी तालुक्याच्या आगमनापासून प्रस्थानपर्यंत स्वागतासाठी तयार असणार आहे.
जरांगे पाटील 21 तारखेला पाथर्डी तालुक्यातून मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी मिडसागवी, खरवंडी, टाकळी फाटा, शेकटे, तनपुरवडी व पाथर्डी या ठिकाणी मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालेले या पायी दिंडीला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये वैद्यकीय, जेवण, पाणी इतरांनी प्रकारच्या सर्व सुविधा पाथर्डी तालुक्यातून नगरच्या दिशेने रवाना होईपर्यंत त्यांना मिळणार आहेत. या बैठकीला माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, राजेंद्र जगताप, विष्णू थोरात, अनिल बंड, राजेंद्र बोरुडे, देवा पवार, माजी सभापती बन्सी आठरे, जालिंदर वामन, अशोक कर्डिले, चंद्रकांत भापकर, बाळासाहेब देवढे, त्र्यंबक देशमुख, अरुण मुखेकर, बाळासाहेब कोठुळे, भाऊराव पवार, राजेंद्र गाडे व बाबा गायके उपस्थित होते.