पुणे – उन्हाळी सुट्ट्यांमुळे उद्यानांची वेळ वाढविली

रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार प्रमुख उद्याने

पुणे – उन्हाळी सुट्ट्यांमुळे महापालिकेच्या उद्यानांमध्ये पर्यंटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत महापालिकेची उद्याने रात्री 8 ऐवजी 9 वाजेपर्यंत खुली ठेवली जाणार आहेत. त्यानुसार, वेळेत बदल करण्याचे आदेश उद्यान विभागाकडून नुकतेच काढण्यात आले आहेत.

शहरात महापालिकेची सुमारे 200 उद्याने आहेत. त्यातील काही प्रमुख उद्यानांमध्ये उन्हाळ्यांच्या सुट्टीत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात, स्वर्गीय पु. ल. देशपांडे उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारसबाग, कमला नेहरू उद्यान, हडपसर येथील लोहिया उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशा प्रमुख आणि मोठ्या उद्यानांचा समावेश आहे. या उद्यानांसाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 ही वेळ निश्‍चित करण्यात आलेली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या उद्यानात पर्यंटक तसेच बालचमूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी आता सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला असून त्याबाबतचे कार्यालयीन परिपत्रक नुकतेच काढण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

चारही फुलराणी सुरू
उन्हाळ्याच्या सुट्टीत बालचमूंचे खास आकर्षण असलेल्या फुलराणी (टॉय ट्रेन) महापालिकेकडून शहरातील चार उद्यानांत उभारण्यात आल्या आहेत. कात्रज तलाव, पेशवे उद्यान, वडगावशेरी येथील शिवाजी महाराज उद्यान, तसेच घोरपडे पेठेतील घोरपडे उद्यानात या ट्रेन आहेत. सुट्टीच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व ट्रेनची देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून प्रमुख उद्यानातील खराब खेळणीही उद्यान विभागाकडून नुकतीच बदलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.