पुणे – अप्रशिक्षित शिक्षकांची नोकरी धोक्‍यात

हजार जणांनी सोडले डी.एल.एड. पदविका शिक्षण : प्रशिक्षणासाठी मुदतवाढ मिळेना

– डॉ.राजू गुरव

पुणे – राज्यातील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थानमार्फत डी.एल.एड.पदविका शिक्षण पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत 31 मार्चला संपली आहे. दोन वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत 1 हजार 38 शिक्षकांनी पदविका शिक्षण पूर्ण न करता अर्धवट सोडून दिल्याने त्यांची नोकरी धोक्‍यात आली आहे. शासनाकडून पदविका शिक्षणासाठी मुदतवाढ देण्याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

राज्यात मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पूर्वीपासून डी.एड. करण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांनी शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्याला प्राधान्य दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही अधिकृत शासनमान्य प्रशिक्षण न घेता हे शिक्षक शाळांमध्ये काम करत आहेत. सेवेत असलेल्या या अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी विविध कारणांमुळे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 23(2) नुसार सर्व अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी पाच वर्षाच्या आत प्रशिक्षित होणे आवश्‍यक होते. यासाठी पत्राद्वारे डी.एड. करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. सन 2017 च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या कलमामध्ये दुरुस्ती करुन अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी 31 मार्च 2019 पर्यंतची अंतिम मुदत निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास विभागाच्या पत्रानुसार अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी डी.एल.एड. पदविका पात्र होणे अनिवार्य करण्यात आले. राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थानद्वारे या प्रशिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. केवळ या एकाच संस्थेला हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास परवानगी देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमधील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी सन 2017 ते 2019 या वर्षाच्या बॅचसाठी प्रवेश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व त्याबाबतच्या सूचना मुख्याध्यापकांना बजाविण्यात आल्या होत्या.

अशी आहे आकडेवारी
डी.एल.एड. पदविका प्रशिक्षणासाठी राज्यात 106 अभ्यास केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या सत्रासाठी एकूण 6 हजार 139 शिक्षकांनी अर्ज नोंदविले होते. दुसऱ्या सत्रासाठी 5 हजार 101 शिक्षकानीच अर्ज भरले. शिक्षकांनी शाळांचे कामकाज सांभाळत या पदविका प्रशिक्षकांसाठी प्रवेश घेतला हे स्पष्टच आहे. मात्र, पहिल्या सत्रात प्रवेश घेतलेल्या सुमारे 1 हजार शिक्षकांनी दुसऱ्या वर्षात प्रवेश न घेतल्याचे उघडकीस आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.